मला स्वतःला दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांच्याविषयी इतक्या वर्षांत काही माहिती नव्हती. गणिताच्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्यापैकी मनोरंजन (recreational) गणित ही एक. कापरेकर सर यांचे या क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
डहाणू,ठाणे सारख्या खेड्यात १९०५ साली त्यांचा जन्म झाला.त्यांचे शिक्षण अनुक्रमे पुणे आणि मुंबई येथे झाले.त्यांनतर आयुष्यभर त्यांनी देवळाली,नाशिक येथे शाळामास्तर म्हणून सेवा केली.
कापरेकर आपल्या कापरेकर कॉन्स्टन्ट साठी जगप्रसिद्ध आहेत . ६१७४ ही संख्या कापरेकर कॉन्स्टन्ट आहे.
१९४९ साली त्यांनी या संख्येचे वेगळेपण जगासमोर आणले.
खालील काही पायऱ्या केल्यास या नंबरचे वेगळेपण आपल्या लक्षात येते.
पायरी १. कोणतीही चार अंकी संख्या घ्या. (परत-परत येणाऱ्या संख्या नको उदा ११११,७७७७ इत्यादी )
उदा. २०१७
पायरी २. त्यातील अंक हे चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहा .
उदा. २०१७ हा नंबर चढत्या क्रमाने ०१२७ असा लिहिला जाईल आणि उतरत्या क्रमाने ७२१० असा लिहिला जाईल.
पायरी ३. यातील आलेल्या मोठ्यासंख्येतून छोटी संख्या वजा करा.
उदा. ७२१० - ०१२७ = ७०८३
७०८३ ही नवीन संख्या येईल.
पायरी ४. आता ७०८३ साठी पुन्हा पायरी २ पासून आकडेमोड केली असता ६१७४ ही संख्या म्हणजेच कापरेकर कॉन्स्टन्ट मिळेल.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जर ६१७४ वर पुन्हा वरील सारखी प्रक्रिया केली तर येणारी संख्या हि ६१७४ च असेल. (आहे का नाही गंमत)
कापरेकरांनी या संख्येव्यतिरिक्त अनेक संख्यांचे त्यांच्या वैशिष्ट्यानुरूप गट केले आहेत. कापरेकर नंबर, देवळाली नंबर , हर्षद नंबर, डेमलो नंबर ही ती काही उदाहरणे. यावर अनेक प्रकारे काम झाले आहे आणि काही ठिकाणी हे संख्याप्रकार कुठे वापरता येतील का याचा सतत शोध सुरु असतो.
गणितावर, त्यातील संख्यांवर कापरेकरांचे प्रचंड प्रेम होते. त्यांच्या कारकिर्दीत सुरवातीला त्यांच्या कार्याची कुणीही दखल घेतली नाही. भारतातील गणिततज्ञ त्यांना फारसे महत्व देत नव्हते. जेव्हा १९७५ साली अमेरिकेतील प्रसिद्ध गणिततज्ञ मार्टिन गार्डनर यांनी एका गणिती संशोधन पत्रिकेत कापरेकरांबद्दल लिहिले तेव्हा त्यांना जगप्रसिद्धी मिळाली.
संदर्भ :
https://en.wikipedia.org/wiki/D._R._Kaprekar
https://www.youtube.com/watch?v=lb2KaaqYrnM
संकलक: विनय नांदुर्डीकर

No comments:
Post a Comment