Saturday, September 19, 2020

माझ्या कॅरम नॅशनल अनुभवाविषयी

 मी कॅरम या खेळात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे .

मी अंडर १४ अंतर्गत कणकवली (सिंधुदुर्ग) येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत अंतिम सहामध्ये आलो होतो .

यामुळे माझी निवड त्रिवेंद्रम (केरळ ) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली होती . नाशिक मधून मी असे प्रथमच खेळण्यासाठी पाच दिवस बाहेर पडलो होतो . माझ्या प्रत्येक दौऱ्यात वडील बरोबर असायचे . माझ्या या कारकिर्दीत नाशिकच्या पूर्ण टीमची बहुतांश वेळा जबाबदारी वडिलांवरच असायची. इथे आमची अनेकांशी गट्टी जमली . ओळखी बनल्या . मुंबईच्या एका गृहस्थांनी आम्हाला नाशिकमध्ये कुठे राहता असे विचारले . आम्ही सांगितले "सातपूर" येथे . तर त्यांनी आमच्या सातपूर येथील उत्तम बंदावणे .या कॅरमपटूविषयी माहिती पुरवली. नाशिकला आल्यावर आम्ही उत्तम काकांशी संपर्क साधला . त्यांचा बिटगेम मध्ये खूप दबदबा होता आणि ते व्यसनही करायचे . त्यांचे मंडईत भाजीपाल्याचे दुकान होते . माझ्याबद्दल त्यांना माहिती मिळाली होतीच आणि आता आम्ही त्यांशी संपर्क साधला होता त्यामुळे ते आनंदाने' दारू न पिऊन' येण्याच्या बोलीवर माझी प्रॅक्टिस घ्यायला येऊ लागले .

केरळचा दौरा सुमारे दहा दिवसांचा होता. माझ्यासोबत वडील , मुंबईचा माझा एक भाऊ (कुठे काही आडायला नको म्हणून ) आणि माझे गुरु उत्तम बंदावणे काका असे नाशिक मधून दिघे होतो. नाशिकमधून अजून एका महिला कॅरमपटूची निवड झाली होती पण त्यांची ओळख आम्हाला केरळ येथे असताना झाली . ज्यांच्या विरुद्ध काही दिवसांपूर्वी लढलो होतो तेच आता आपल्यासोबत महाराष्ट्रासाठी खेळताना दिसत होते . मी सुमारे सिंगलचे चार राऊंड काढले होते . मी ज्याच्या विरुद्ध हरलो त्याच चेन्नईच्या श्रीनिवासने फायनल मारली होती.

प्रवासात महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने रेल्वेच्या तिकिटांची सोया केली होती . त्यासोबतच राहण्याची - खाण्यापिण्याची सोयही यजमान असोसिएशन ने अगदी छान ठेवली होती . या दौऱ्यात एक दिवस केरळही फिरून आलो . केरळचे बॅकवॉटर , बीचवरील मस्ती कधीही न विसरता येणारी अशी होती . याच दौऱ्यादरम्यान उत्तम काकांची अजून एक गोष्ट कळली ती म्हणजे ते "शूर आम्ही सरदार " अगदी सुंदर गायचे.

अडजस्टमेन्ट ही गोष्ट मला अनुभवायला मिळाली .परतीच्या प्रवासात तिकिटांची कमी निर्माण झाली असेल म्हणून महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे जंगम सर यांनी त्यांचे सीट मला share करायला दिले होते . रायगडाचे पारकर काका , सिंधुदुर्गचे कारभारी काका अश्या अनेकांचा सहवास लाभला . पुढे बऱ्याच वर्षांनी जेव्हा पोयनाड (रायगड ) येथे स्पर्धा भरवण्यात आली होती तेव्हा आम्ही पारकर काकांच्या घरीच उतरलो होतो . त्यांनी खूप छान पाहुणचार केला होता . तेही नाशिकला आमच्याकडे येऊन गेले . काही वर्षांपूर्वीच त्यांचे एका दुर्धर आजाराने निधन झाले . त्यांचे सौम्य बोलणे , style याचा नाही म्हटलं तरी प्रभाव पडतोच.

कॅरमचा प्रवास कसा सुरु झाला हा एक वेगळा विषय होईल पण मला या खेळात माझ्या कुटुंबाने , माझ्या शाळेने आणि मित्र वर्गाने खूप साथ दिली .

वरील फोटोत जे माझा आणि माझ्या वडलांचा सत्कार करत आहेत ते आहेत सुहास कांबळी. कॅरममधील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्टीय स्पर्धा ते जिंकलेले आहेत .

शालेत असताना मी माझ्या रचना विद्यालयचे शालेय स्पर्धेत जिल्हा , विभागीय आणि राज्य पातळीवर प्रतिनिधित्व केले . यात मला श्री. यशवंत ठोके सरांची खंबीर साथ लाभली. शाळा प्रशासन कॅरम स्पर्धेला पाठवण्यास खूप उदासीन होते कारण आमच्या अगोदरचा संघ दरवेळेस जायचा आणि हाती काहीच लागायचे नाही पण ठोके सरांनी आमच्यावर विश्वास दाखवला होता आणि आम्ही तो विश्वास सार्थ ठरवलाही.

दहावीला असताना, बहुतेक शिरपूर येथे झालेल्या स्पर्धेत मी पहिला आलो. धुळे , जळगाव ,शिरपूर अश्या ठिकाणी विभागीय स्पर्धा भरवल्या जायच्या. आणि माझी निवड सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली , मी सांगलीला दुसरा आलो .

यादरम्यान माझी दहावीची तोंडी परीक्षा चालू होती , सराव परीक्षा चालू होती पण शाळेने खूप सहकार्य केले. ते मला पडलेल्या अंतर्गत गुणांनी दाखवले होते . पण एकंदरीत सांगली दौऱ्याचा अनुभव खूप वाईट होता . मी खूप तापलो होतो, तापाने फणफणत खेळलो आणि नाशिकला येताना वडिलांना बसमध्ये पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या लागत होत्या . पुण्याला उतरून ऍडमिट व्हावे इथवर विचार झाला होता .

हा एका फायनालाच फोटो आहे . माझ्या बरोबर मागे पांढऱ्या शर्ट मध्ये ठोके सर आहेत , बाजूला वडील उभे आहेत . ही स्पर्धा भुजबळ फेस्टिवल अंतर्गत भरवली गेली होती आणि मी जिंकली होती.

धन्यवाद !

No comments:

Post a Comment

Pappa @60