Wednesday, December 3, 2025

Pappa @60

आज पप्पांचा साठावा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे त्यांना कधीच विशेष वाटले नाही; त्यांनी आयुष्यभर स्वतःच्या आनंदापेक्षा कुटुंबाचा आनंद अधिक महत्त्वाचा मानला. त्यामुळे हा दिवस साजरा करणे त्यांच्यासाठी कधीही मोठी गोष्ट नव्हती. तरीही गेली दोन-चार वर्षे आम्ही प्रेमाने हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आहे. साजरा करणे म्हणजे कुठे हॉटेलात जाऊन मोठा कार्यक्रम करणे, अशी काही गोष्ट आम्ही केलेली नाही. आमच्यासाठी वाढदिवसाचा अर्थ साधा आहे—घरच्या वातावरणात, आपल्या लोकांमध्ये, प्रेम आणि कृतज्ञतेने साजरा होणारा एक शांत क्षण. मागच्या वर्षी मात्र पप्पांचा वाढदिवस विशेष ठरला, कारण ते ज्या वारकरी शिक्षण संस्थेत सचिव आहेत, त्या संस्थेत त्यांचा वाढदिवस मनापासून साजरा करण्यात आला. त्या दिवशी आम्ही लहान मुलांना भेटलो, त्यांच्या निरागस चेहऱ्यांवरचा आनंद, पप्पांना पाहताच उमटलेली चमक आणि त्यांनी दाखवलेला आदर पाहून मन भरून आलं. पप्पांनी नेहमीच या मुलांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्या मुलांना त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम पाहताना जाणवलं की पप्पांच्या आयुष्यातील खरी संपत्ती म्हणजे लोकांच्या मनातला आदर आणि आपुलकी.

त्यांचे लहानपण अत्यंत संघर्षमय गेले. आठ भावांमध्ये ते सातवे. तब्येतीने लहानपणी ते इतके कमजोर होते की “जगेल की नाही” अशी शंका वाटावी, म्हणून त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं जात असे. माझ्या आजीच्या आजारपणामुळे इयत्ता सातवी, आठवी आणि नववीत असतानाच घरातील स्वयंपाकाची जबाबदारी पप्पांवर आली. एवढ्या लहान वयातही त्यांनी सानसूंदीचा स्वयंपाक करून संपूर्ण घर सांभाळले. घरातील परिस्थिती कठीण असल्याने सर्व भावांनी कष्ट केले, पण पप्पांनी मात्र जबाबदाऱ्या मनापासून उचलल्या. पुढे त्यांनी नांदुर्डीच्या वाचनालयात अनेक वर्षे ग्रंथपाल म्हणून काम केले. शांत, अभ्यासू वातावरणात त्यांनी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केलेलं ते काम आजही स्मरणात राहिलेलं आहे.

यानंतर पप्पांनी नांदुर्डीत शेतीही केली. शेतीविषयी त्यांना आजही अफाट ज्ञान आहे. आमच्या घरासमोरील बौद्ध विहारात त्यांनी विविध भाज्या, फळझाडे, फुलझाडे लावली आणि परिसराला नवसंजीवनी दिली. घराच्या मागील जांभूळ आणि वड ही दोन्ही झाडं त्यांनीच लावली. मी लहान असताना आम्ही त्या झाडांना घरातील बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या मटेरियलचा मजबूत पार बांधला होता—पप्पांच्या मदतीने. आज ती झाडं प्रचंड मोठी झाली आहेत.

कष्टमय लहानपण जसं गेलं, तसंच त्यांचं संपूर्ण आयुष्यही कष्ट, शिस्त आणि जबाबदाऱ्यांनी भरलेलं राहिलं. चाळीस वर्षांपासून ते लाँड्रीचा व्यवसाय करत आहेत. या प्रवासात रमेश काकांची त्यांना उत्तम साथ मिळाली. सकाळी मी उठण्यापूर्वीच पप्पा उठलेले असतात. स्वच्छता, परिसराची निगा राखणे आणि नियमानुसार काम करणे हे त्यांच्या स्वभावात मुरलेलं आहे. लाँड्रीच्या व्यवसायात एक काळ असा आला की तीन-तीन दिवस झोप न घेता काम करावं लागे, पण ग्राहकाला दिलेलं वचन त्यांनी कधी मोडलं नाही. 2003 मध्ये नानांकाका गेल्यानंतर दोन दुकानांची संपूर्ण जबाबदारी त्यांनी एकहाती सांभाळली. घर, व्यवसाय, कुटुंब—सगळं त्यांनी शांतपणे, काटेकोरपणे आणि मनापासून सांभाळलं.

त्र्यंबकेश्वरच्या दुर्गम आदिवासी पाड्यांवर त्यांनी सुमारे सात मंदिरांच्या उभारणीत मौलिक मार्गदर्शन केलं. नांदगाव कोहळीचे ज्ञानेश्वर मंदिर, नव्हपाड्याचे महादेव मंदिर, तसेच इतर पाड्यांवरील राधा–कृष्ण आणि विठ्ठल मंदिरं—ही सर्व त्यांच्या समर्पणातून उभी राहिली. त्यांनी या पाड्यांमधील लोकांच्या जीवनात बदल घडवले. दारूपासून दूर राहण्याचा संकल्प त्यांनी सर्वांना प्रेरित करून करवून घेतला. वारकरी परंपरेचा मार्ग सुकर केला आणि विशेष म्हणजे, हे सर्व कार्य त्यांनी 2016 मध्ये हृदयशस्त्रक्रिया झाल्यानंतरही तेवढ्याच जोमाने पुढे चालूच ठेवलं. स्वतः बाईकवरून दुर्गम भागात ते जायचे.

पप्पांनी पै-पै जमवून विजय आणि मला दोघांनाही शिकवलं. घरची परिस्थिती साधी असतानाही त्यांनी आमच्या शिक्षणात कधीच तडजोड केली नाही. त्यावेळी कदाचित आम्हाला त्यांच्या त्यागांची जाणीव झाली नसेल, पण आज मात्र त्या प्रत्येक त्यागाची किंमत प्रकर्षाने जाणवते. आज विजय शिष्यवृत्तीवर परदेशात पीएचडी करत आहे, आणि हे पाहून पप्पांना वाटणारा अभिमान शब्दांत मावणार नाही. आमची प्रगती ही त्यांच्या कष्टांचं फळ आहे आणि आमचं प्रत्येक यश त्यांच्यासाठीच आहे.

ईश्वर कृपेने आज त्यांचे स्वतःचे घर झाले आहे. फर्निचरचे काम सुरू आहे—आणि हे सर्व त्यांच्या आयुष्यभराच्या संयमाचं आणि प्रामाणिकतेचं फलित आहे. पप्पांनी नेहमी मला बचतीचा संदेश दिला. छोट्या गोष्टीतून मोठं घडतं आणि कष्टातून भविष्य उभं राहतं—हे त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यानेच शिकवले.

आज त्यांच्या साठाव्या वाढदिवशी त्यांना आभाळभर शुभेच्छा. ईश्वर त्यांच्या पुढील आयुष्याला उत्तम आरोग्य, शांतता, आनंद आणि समाधान देवो—हीच मनापासून प्रार्थना.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा.

-विनय

Pappa @60