Sunday, March 28, 2021

विराग काका

 ....बाहेर उजाडलही नव्हतं. सुर्य पश्चिमेला उगवावा तसा एका काकाचा मला मेसेज आला. "अरे बिट्या काकाचा फोटो असेल तर पाठव ना"...


विराग मनोहर नांदुर्डीकर हे त्यांचे खरे नाव असले तरी प्रेमाने मोठे लोकं त्यांना बिट्या म्हणायचे. मी त्यांना कधी बिट्याकाका तर कधी विराग काका म्हणायचो. मला अगोदरच्या पिढीचे एखाद्याचे टोपणनाव ठेवण्याच्या कलेचे नेहमी अप्रूप वाटते. अतिशय चपखल नाव ठेवलेली आहेत. मला स्वतः ला कोणाला नावं ठेवायला जमत नाही आणि मी ठेवलेली नावं कोणाला आवडणार नाहीत याची खात्री वाटते. असो.


सर्व भावंडात सर्वात लहान होते विरागकाका. सगळे जमल्यावर विरागकाका आम्हा छोट्या मंडळीत खेळत असत. रमत असत. आम्ही प्रत्येक छोट्या-मोठ्या सण- उत्सव, सुख- दुःखात त्यांना आमच्यासोबत बागडताना पाहिले आहे. क्रिकेट हा त्यांचा आवडीचा खेळ. त्यांची पहिली बॅटिंग ठरलेली असे. चांगलं कळायला लागल्यापासून मला ते आमचे सचिन तेंडुलकर वाटायचे. तशीच ठेंगणी मूर्ती. तसाच बॅटिंगचा स्टांस. 


चित्रपटात जसे काही अभिनेत्यांचे डायलॉक प्रसिध्द असतात तसे विरागकाकांचे आपले असे काही खास वाक्य होते. खेळता-खेळता "ह्या वयात..." हे असेच त्यांचे खास ठेवणीतले वाक्य. "एकटा मारू शकतो" वगैरे त्यांच्या तोंडून ऐकायला वेगळेच वाटायचे. "मला कसं माहीत" या वाक्याने त्यांनी अनेकवेळा मला निरुत्तर केले आहे. ते एक वेगळेच रसायन होते. हा लेख वाचल्यानंतर मला अनेकांनी "नाना राईट है " या त्यांच्या अशाच एका वाक्याची आठवण करून दिली.


भेटलेल्या प्रत्येकाची आस्थेवाईपणे चौकशी करणे त्यांना जमायचे. मी एकदा त्यांचेसोबत सिडकोला भाजी मंडईत गेलो होतो आणि मला खूप नवल वाटले. आजूबाजूची प्रत्येक लोकं; मग ती फुलवाले असोत, फळवाले असोत, किंवा इतर व्यावसायिक सगळे त्यांना जय हरी, रामकृष्ण हरी करायचे. सगळे त्यांना ओळखत होते. रस्त्याने दोन तीन व्यक्ती सहज आमच्याशी मिनिटभर बोलून गेल्या. 

आजच्या एखाद्या तथाकथित सामजिक कार्यकर्त्यालाही लाजवेल असा दांडगा जनसंपर्क त्यांचेजवळ होता. 


बाबांच्या (आजोबांच्या) जिव्हाळ्याचा विषय होता वारकरी सांप्रदाय. त्यांच्यानंतर जर नांदुर्डीकर घराण्यात त्यांचा कित्ता कोणी जर गिरवला असेल तर तो विराग काकांनी. "कृष्णर्पणस्तू " या भावनेने त्यांनी संप्रदायाची सेवा केली. पप्पांनी सांगितले की लहानपणी घरी आलेल्या मोठमोठ्या किर्तनकारांचे कीर्तनाची हुबेहूब नक्कल ते त्यांच्यासमोर सादर करायचे. त्यांचे लहानपण नांदुर्डी येथे गेले आणि वातावरण धार्मिक मिळाले. दिवसभर कामावरून आल्यावर ते रात्री भजनाला जात. भजनाला जाण्याअगोदर गाथा चाळत. क्वचित प्रसंगी अभंग टिपून घेत आणि पाठांतर करत. सिडकोत त्यांच्या वारकरी भजन ग्रुपचे ते कर्ताधर्ता होते. अनेक जण याची साक्ष आहेत. 


वयाच्या २९ - ३० ला आलेल्या मोठ्या हृदयविकाराच्या धक्याने त्यांचेवर मुंबई येथे बायपास ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांनी या दुखण्याला पोसले होते. अधून-मधून त्यांना छोटा-मोठा त्रास होत असे पण गेल्या एकादशीला आलेल्या धक्यातून ते सावरू शकले नाहीत. एकादशीच्या मुहूर्तावर त्यांनी देह ठेवला. शारीरिक व्याधी असूनही ते नेहमी आनंदी असत आणि इतरांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचे. कोणी दुःखी कष्टी असलेला त्यांना बघवले गेले नाही. स्वभावाने प्रचंड हळवे आणि संवेदनशील होते. दरवर्षी दत्तजयंतीउत्सवात भजन म्हणत असताना ते अत्यंत भावनिक होत. इतक्या तन्मयतेने ते भजनात दंग होत. 


मी त्यांना खास भेटायला यश अर्केड, सिडकोला जायचो. अनेकदा तेथे भत्ता, इडली असा बेत झाला असेल. जाताना जिण्यापर्यंत सोडवायला यायचे आणि पुन्हा माघारी फिरून गॅलरीतून मला रत्यातून दिसेनासा होईपर्यंत हात वर करून अभिवादन करत बघत बसायचे. घरात ते एकमेव व्यक्ती होते की ज्यांनी कोणताही छोटा - मोठा सण टाळला नाही. हृदयाचा त्रास असूनही सणासुदीला मोठ्यांच्या पाया पडताना पार डोकं समोरच्याच्या पायावर टेकवत. मी त्यांना अनेकदा याबाबत बोललो होतो की तुम्ही असा नमस्कार केला नाही तरी चालू शकते. पण मला वाटतं काही बाबतीत ते हट्टी होते. 


त्यांच्या स्वभावाचा अनेकांना फायदा झाला. मी इंजिनिअर झाल्यानंतर मला माझी पहिली नोकरी त्यांचेमुळेच लागली होती. ती नोकरी मी सोडू नये असे त्यांना वाटत होते. अखेरीस नुकतीच मला एक चांगली नोकरी लागली आणि कंपनीने स्वखर्चाने विमानाचे तिकीट काढले याचा त्यांना प्रचंड आनंद झाला होता. त्यांनी तो बाबांचा (आजोबांचा) चमत्कार आहे असे आईला बोलून दाखवले होते. 


त्यांचा आवाज खूप सुंदर होता. अधून-मधून ते खूप छान भजन / गाणी गुणगुनायचे. आम्हा लहानग्यांना कोट्या करून प्रचंड हसवत. जेवायला पंक्तीत बसलो तर सतत बडबड चालू असे. विनोदनिर्मितीसाठी त्यांचा अट्टाहास चालायचा. 


त्या दिवशी विजय मला म्हणाला की मला ते आनंद चित्रपटातील राजेश खन्ना सारखे वाटले...कदाचित विराग काकांनीही तो चित्रपट आवडत असेल पण मला कधी हे विचारण्याची संधी मिळाली नाही....









3 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Bhavpurn Shradhhanjali....🙏

    Aplyala havi asnari hakkich jaga jevha hiraun jate tevha paristhiti far vait asate....Tuzya lekhatun Kakanvishyicha Aadar mala far molacha vatato.!

    ReplyDelete

Pappa @60